मुंबई : घुसखोर बांगलादेशी नागरिकांना रोजगारासाठी आश्रय देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक, व्यापारी आणि उद्योगपतींवर आता कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात गृह विभागाने अलीकडे परिपत्रक जारी केले असून सर्व प्रशासकीय विभागांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मुठभर व्यावसायिकांच्या वैयक्तिक फायद्यामुळे अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे पोलीस विभागाने केलेल्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बांधकाम व्यावसायिक, छोटे-मोठे उद्योजक आणि व्यापारी आपले वैयक्तिक आर्थिक हित जपण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना कामावर ठेवत आहेत. हे नागरिक स्वस्त मजुरीवर उपलब्ध होत असल्याने अनेक ठिकाणी त्यांना प्राधान्य दिले जाते. मात्र, यामुळे राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होत असल्याचे सरकारने या परिपत्रकात नमूद केले आहे. कोणत्याही व्यावसायिक आस्थापनांवर घुसखोर बांगलादेशी नागरिकांना कामगार म्हणून ठेवता येणार नाही. बांधकाम मजूर, मेकॅनिक आणि वेल्डर,वाहन चालक, प्लंबर आणि वेटर आदी क्षेत्रात बांगलादेशी कामगार आढळल्यास थेट मालकांना जबाबदार धरले जाणार आहे. यासाठी आवश्यकता असल्यास कायद्यात आणि नियमावलीत सुधारणा करण्याचे संकेतही परिपत्रकात दिले आहेत. ‘राष्ट्रीय सुरक्षा सर्वोच्च’ असल्याचे सांगत, कोणत्याही परिस्थितीत घुसखोरांना रोजगार दिला जाऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत.







