मुंबई : निवडणूक कर्तव्यावर असताना पालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा कर्मचारी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात कर्तव्यावर होता. आदल्या दिवशी मतदान केंद्रात दाखल झाल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
वांद्रे, सांताक्रूझचा भाग असलेल्या एच पश्चिम विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी अनिल सातपुते यांना निवडणुकीसाठी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात जबाबदारी देण्यात आली होती. मतदानाच्या आदल्या दिवशी अंधेरी पूर्व येथील सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेत त्यांना मतदान केंद्रावर बोलावण्यात आले होते. मतदान केंद्रावर असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यावेळी त्यांना जोगेश्वरीच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याबाबतचा वैद्यकीय अहवाल अद्याप आलेला नाही.