नाशिक : शहरातील इंदिरानगर परिसरातील अशोक लेलँड कंपनीच्या महावीर व्हील्स या शोरूम मध्ये हा प्रकार घडला आहे. निर्भय महाराष्ट्र पक्षाचे जितेंद्र भावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोंधळ घातला. त्याचे फेसबुक लाईव्ह करून खंडणीची मागणी केली. पुन्हा अशाच प्रकारे काहीतरी तक्रारी घेऊन येत समाज माध्यमात चित्रफिती प्रसारित केल्या जातील, अशी धमकी दिली. निर्भय महाराष्ट्र पक्षाचे नेते जितेंद्र भावे, वाहन मालक दिगंबर पाठे आणि राजेंद्र गायधनी यांसह काही कार्यकर्ते या दुकानात गेले होते. यावेळी त्यांनी दुरुस्तीसाठी आलेल्या गाडीचे स्पेअर पार्ट्स काढून घेतले आहेत, असा आरोप केला. त्या बदल्यात अडीच लाख रुपये देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास वारंवार दुकानात येऊन फेसबुक लाईव्ह करण्यात येईल त्याद्वारे दुकानाची बदनामी करण्यात येईल आणि ग्राहकांमध्ये संस्थेची प्रतिमा मलिन करण्यात येईल, असेही धमकावण्यात आले.
यासंदर्भात दुकानातील व्यवस्थापकाने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यावरून निर्भय महाराष्ट्र पक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र भावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध यापूर्वीही विविध शासकीय कार्यालयांमध्ये गोंधळ घातल्याने पोलिसात गुन्हा दाखल आहे. विविध प्रश्नांवर टोकाचे आंदोलन आणि एकेरी भाषेचा वापर करीत अधिकाऱ्यांना धमकावणे ही या पक्षाचे नेते जितेंद्र भावे यांची कार्यशैली आहे. त्यांचे सहकारी याबाबत फेसबुक लाईव्ह करतात. त्यातून संबंधितांना धमकावल्याचा आनंद ते घेत असतात. समाज माध्यमांचा गैरवापर करून अशाप्रकारे व्यवसायिकांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे याबाबत गंभीर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे







