पुणे : पुणे शहरात सध्या कायदा व सुव्यवस्था औषधालाही शिल्लक नाही. भर दिवसा होणारे खून, गोळीबार, कोयत्याचे वार, लूट, टोळी युद्ध हे चित्र पुण्यात सर्वत्र दिसत आहे. पुणेकरांना दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडताना जीव मुठीत घेऊन बाहेर पडावे लागत आहे. आपल्या परिवारातील सदस्य घराबाहेर जाताना ती जिवंत पुन्हा घरी येईल की नाही याची कोणालाही शाश्वती नाही. अशाच परिस्थितीत काल बाजीराव रोड येथे एका तरुणाची भर दिवसा निर्घृण हत्या झाली. या घटनेता निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाने मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावरुन आता पुन्हा राजकारण तापले असून पुणेकरांच्या सुरक्षितता राखण्यास पोलिसांना अपयश आल्याचा आरोप केला जात आहे.
पुण्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिक भयभीत झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाने केला आहे. बाजीराव रस्त्यावर मंगळवारी भर दिवसा तरुणाची निर्घृण हत्या झाली. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने(शरद पवार गट) अभिनव कला महाविद्यालय चौक येथे तीव्र आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी मुखमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली.







