नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत पत्नीचे नाव समाविष्ट न झाल्याच्या कारणावरून एका मद्यपी पतीने पत्नीला क्रूरपणे मारहाण केल्याची अत्यंत संतापजनक घटना अमरावती जिल्ह्यातील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारसी गावात घडली आहे. आधार कार्डवर पतीचे नाव नोंदणीकृत नसल्यामुळे पत्नीला योजनेचा लाभ मिळाला नाही, या क्षुल्लक कारणावरून पतीने क्रूरतेचा कळस गाठला. मारहाणीनंतर आरोपी पती आकाश रूपचंद भालेकर (२८, रा. सारसी) हा फरार झाला आहे. लोणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पीडितेचा आणि आरोपी आकाश भालेकरचा विवाह सुमारे दीड वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर पत्नीने नवीन आधार कार्ड काढण्यासाठी आणि त्यावर पतीचे नाव नोंदवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु तांत्रिक अडचणींमुळे नवीन आधार कार्ड तयार झाले नाही. यामुळे तिला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी नोंदणी करता आली नाही, ज्यामुळे ती दरमहा मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासून वंचित राहिली. गावातील इतर महिलांना या योजनेचा लाभ मिळत असताना, पीडितेला मदत न मिळाल्याने आरोपी पती आकाश भालेकर वारंवार पत्नीवर संताप व्यक्त करत होता. आरोपी पती दारू पिऊन घरी परतला आणि त्याने पत्नीच्या योजनेत नाव समाविष्ट न होण्याच्या मुद्द्यावरून वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेला आणि संतप्त झालेल्या पतीने कंबरेचा चामड्याचा पट्टा काढून पत्नीला बेदम मारहाण केली. या अमानुष हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पीडितेने लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.







