बीड : बीडमधील एका बड्या नेत्याने मनोज जरांगे पाटील यांना मारण्याचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बीडच्या परळीमधील हा नेता असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आहे. या कटामध्ये सहभागी असणाऱ्या दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या एका जुन्या सहकाऱ्याचा देखील समावेश आहे.
बीडमध्ये मनोज जरांगेच्या हत्येचा कट रचण्यासाठी बैठका पार पडल्या. याप्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीडमधून दोघांना ताब्यात घेतले. अमोल खुणे आणि दादा गरुड असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत. अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. मनोज जरांगेंना मारण्याचा कट रचण्यात आल्यानंतर मराठा समन्वयकांनी बीडच्या पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले असून जरांगे पाटलांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. यावेळी धनंजय देशमुखांसह जरांगे पाटलांचे अनेक सहकारी उपस्थित होते. मनोज जरांगेंच्या हत्येसाठी कट रचण्यात आला होता. या कटामध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा उल्लेख असून त्यासंदर्भातील व्हिडीओ आणि इतर पुरावे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे आहेत. जालना पोलिस ठाण्यात धाव घेत मनोज जरांगे आणि मराठा समन्वयकांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन देत यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.







