मुंबई : निवडणुका आल्या की काही लोक बदनामीची खेळी खेळतात. निवडणुका येतात आणि जातात पण त्यांनी लक्षात ठेवावे, ज्यांचं घर काचेचं असतं, त्यांनी इतरांवर दगड मारू नये’, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावरील टीकेवरून ठाकरे गटाला दिला.
शिवसेना ठाकरे गटाकडून शिवसेना (शिंदे) नेते रामदास कदम आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर अधिवेशनात आरोप करण्यात आले होते. या आरोपांवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. गोरेगावमधील नेस्को येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत सिद्धेश कदम यांनी आयोजित केलेल्या विशेष शिबिरात ते बोलत होते. पूर्वी नागरिकांना कामासाठी सरकारी कार्यालयात अनेक फेरे मारावे लागत होते, तरीसुद्धा त्यांचे काम होत नव्हते. त्यामुळे ते शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकत नव्हते. पण आता सरकार थेट त्यांच्या दारी पोहोचत असल्यामुळे लोकांना मोठा फायदा होत आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.







