बारामती : लोकसभा मतदारसंघातील रेल्वे विभागाशी संबंधित विविध अडचणी तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी सेंट्रल रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांना केले. बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर तालुक्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात सुप्रिया सुळे यांनी इंदु दुबे यांची पुण्यात भेट घेऊन त्यांना सविस्तर पत्र देत या मागण्या मार्गी लावण्याची विनंती केली आहे. या मध्ये दौंड रेल्वे स्थानकाच्या बाबत सहजपुर, खामगाव खुटबाव येथे उड्डाणपूल (ROB) बांधण्यात यावेत, रेल्वे गेट १३, बोरीपारधी, कडेठाण, कानगाव, गार, घोलपघर येथील भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचते, हे काम निकृष्ट झाल्याची लोकांची तक्रार असून यात योग्य कार्यवाही करावी, खानोटा पोटफोडे वस्तीलगतचा सेवा रस्ता खुला ठेवावा, भुयारी मार्ग करावा, दौंडचे लोकोशेड तातडीने सुरु करावे, दौंडमधून सकाळी पुण्याला लोकल सोडावी, दौंड हडपसर डेमू पुण्यापर्यंत न्यावी, पुणे दौंड शटल गाडीच्या डब्यांची संख्या वाढवावी, दुपारी दौंडहून पुण्याला जाणारी डेमू गाडी असावी, मुंबई चेन्नईतसेच चेन्नई – मुंबई गाडीला उरुळी कांचन मध्ये थांबा मिळावा, लोणावळा- पुणे सारखी पुणे – दौंड लोकल सुरु व्हावी, कन्याकुमारी एक्स्प्रेसची वेळ पूर्ववत करावी, चेन्नई एलटीटी गाडीचा थांबा दौंडला द्यावा, यशवंतपूर बिकानेर व विशाखापट्टणम गाडीचा दौंडला थांबा द्यावा अशा मागण्या आहेत.
इंदापूर तालुक्यासाठी भिगवण ते राजेगाव रोड येथे उड्डाणपूल करावा, पुरंदर तालुक्यात पिसुर्टीच्या पुढे उड्डाणपूल व्हावा, पारगाव रेल्वे गेट जवळील रस्ता रुंद करावा, पिंपरे येथे जेऊर रस्त्यापर्यंत सेवा रस्ता करावा, जेजुरी रेल्वे उड्डाणपूल ते धालेवाडी रेल्वे गेट रस्त्यापर्यंत सेवा रस्ता करावा, मुंबई कोल्हापूर वंदे भारत रेल्वेला जेजुरीमध्ये थांबा द्यावा, सातारा पुणे पॅसेंजर पुणे स्टेशन येथे थांबवावी, पुरंदर तालुक्यातील भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचते यावर उपाययोजना करावी, वाल्हे वागदरवाडी भुयारी मार्गाची जागा बदलावी, बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथेल फलाटाची उंची वाढवावी, बारामतीतील मालधक्का शहराबाहेर हलवावा, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.