मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सी समरी म्हणजेच तपास बंद करण्याचा क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. पण तेव्हा रवींद्र वायकर हे ठाकरेंच्या शिवसेनेत होते. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना उमेदवारी देण्यात आली. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल गजानन किर्तिकर यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढली. अटीतटीच्या लढतीत खूप कमी फरकाने ही निवडणूक जिंकली. यानंतर काही दिवसातच खासदार रवींद्र वायकर यांना दिलासा मिळाल्याने विरोधकांकडून टिकेची झोड उठवली जात आहे.
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. मुंबई पोलिसांनी कोर्टात दाखल क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय. रवींद्र वायकर हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. दरम्यान मुंबई मनपाकडून गैरसमजुतीतून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.