ठाणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात मासेमारी बंद झाल्याने सुक्या मासळीची मागणी वाढू लागली आहे. मात्र यंदा मासळीची आवक घटल्याने सुक्या मासळीच्या दरात १०० ते १५० रुपयांपर्यंत वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खरेदीवर होताना दिसत आहे. मच्छीमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य शासनाने महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. त्यामुळे ताज्या मासळीची उपलब्धता कमी झाली असून अनेक मांसाहारी नागरिकांचा कल सुक्या मासळीकडे वळला आहे. बोंबील, जवळा, कोलंबीचे सोडे, वाकट्या आणि करंदी या सुक्या मासळीच्या प्रकारांना विशेष मागणी असते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मासळीची आवक कमी झाल्याने बाजारातील दर वाढले आहेत. सध्या करंदीचे एक पॅकेट ५०० रुपयांना, बोंबीलची चार पॅकेट १५० रुपयांना आणि जवळा अर्धा किलो २५० रुपयांना विकला जात आहे. वाढत्या किमतींमुळे ग्राहक पूर्वीइतकी मोठ्या प्रमाणावर खरेदी करत नसल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे.
पावसाळ्यातील टंचाई लक्षात घेऊन अनेक कुटुंबे एप्रिल आणि मे महिन्यातच सुक्या मासळीची खरेदी करून ती उन्हात वाळवून साठवून ठेवतात. ताज्या मासळीच्या वाढत्या किमती आणि मर्यादित उपलब्धतेचा सामना करण्यासाठी ही पारंपरिक पद्धत आजही मोठ्या प्रमाणावर अवलंबली जाते. मात्र यंदा वाढलेल्या दरांचा परिणाम विक्रीवरही जाणवत असल्याचे विक्रेते सांगत आहेत. विक्रेते गोविंद यांच्या मते, ग्राहकांची मागणी कायम असली तरी खरेदीचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी झाले आहे. ही सुकी मासळी मुख्यतः भाईंदर आणि कुलाबा परिसरातून बाजारात आणली जाते. गेल्या वर्षी ३५० ते ४०० रुपयांना मिळणारे करंदीचे पॅकेट यंदा ५०० रुपयांवर पोहोचले आहे. तसेच चार पॅकेट बोंबीलसाठी पूर्वी १०० रुपये मोजावे लागत होते, त्यासाठी आता १५० रुपये खर्च करावे लागत आहेत. जवळा अर्धा किलोचा दरही १५० ते २०० रुपयांवरून २५० रुपयांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे सुक्या मासळीची मागणी कायम असली तरी वाढलेल्या किमतींमुळे ग्राहक मर्यादित प्रमाणात खरेदी करत असल्याचे चित्र ठाणे आणि मुंबई परिसरातील बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे.







