ठाणे : एअर तिकीट बुकिंगचा टास्क पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला चांगले कमिशन दिले, नंतर मात्र सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीच्या जाळ्यात ओढत डोंबिवलीतील एका व्यक्तीकडून ऑनलाइनद्वारे तब्बल ३४ लाख ३२ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींविरुद्ध मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
डोंबिवलीमध्ये वास्तव्यास असलेले अमित (नाव बदलले आहे) अंबरनाथमधील फार्मा कंपनीत नोकरी करतात. मागील महिन्यात टेलिग्राम ॲपवरून नोकरी शोधताना त्यांना एका व्यक्तीचा नोकरीबाबत मेसेज आला. या व्यक्तीने त्याची एअर तिकीट बुकिंग कंपनी असून कंपनीच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन तिकीट बुकिंगचे काम असल्याचे अमित यांना सांगितले. त्याने एक लिंकही पाठवली. ही लिंक उघडून अमित यांनी लिंक वर नोंदणी केली. तसेच, या संकेतस्थळावरच एअर तिकीट बुकिंग करण्याचा टास्क पूर्ण केल्यानंतर कमिशन देण्याचे या व्यक्तीने आमिष दाखवल्याने ते हे काम करण्यास तयार झाले. टास्क पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला ऑनलाइन १० हजार रुपये पाठवत त्यांनी पहिला टास्क पूर्ण केला. या कामाचे त्यांना १७ हजार ६६४ रुपये मिळाले. नंतर सायबर गुन्हेगारांनी दुसरा टास्क पूर्ण करण्यासाठी अमित यांच्याकडून ३६ हजार रुपये घेतले. हा टास्क पूर्ण केल्याबद्दल त्यांना ४८ हजार ७७३ रुपये मिळाले. चांगले पैसे मिळत असल्याने या कामावर अमित यांचा विश्वास बसला.
सायबर गुन्हेगार अमित यांना वेगवेगळे टास्क देत त्यांना बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगत होते. त्यानुसार त्यांनी एकूण ३४ लाख ३२ हजार रुपये बँक खात्यांमध्ये पाठवले. तसेच, त्यांनी एअर तिकीट बुकिंगचे टास्कही पूर्ण केले. परंतु, या कामाचे कमिशन न मिळाल्याने त्यांनी विचारणा केल्यानंतर आरोपी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. फसवणूक झाल्याचे कळताच अमित यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली.