बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे लोकार्पण आज बारामतीतील तिरंगा सर्कल परिसरातील नटराज नाट्य कला मंडळ येथे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दिवंगत नेत्याला अभिवादन केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी किशोर माने, मुख्याधिकारी पंकज भुसे, माजी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, पवार कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस बँड पथकाच्या वतीने पुतळ्यास मानवंदना देण्यात आली, तर उपस्थितांनीही दिवंगत अजित पवार यांच्या कार्याला आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमादरम्यान सर्वधर्मीय प्रार्थना आयोजित करण्यात आली आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. तसेच निलिमा नृत्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गीत वंदना सादर करून वातावरण भावपूर्ण केले.
पुतळ्याच्या लोकार्पणानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते दिवंगत अजित पवार यांच्या जीवनप्रवासावर आधारित विशेष छायाचित्र दालनाचेही उद्घाटन करण्यात आले. या दालनामध्ये त्यांच्या सार्वजनिक, राजकीय आणि सामाजिक कार्याची झलक दर्शविणारी विविध छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री यांनी दालनाला भेट देत छायाचित्रांची पाहणी केली. उपस्थित मान्यवरांनी दिवंगत अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. बारामतीच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण यानिमित्ताने उपस्थितांनी व्यक्त केली. पुतळा आणि छायाचित्र दालनाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा परिचय भावी पिढ्यांपर्यंत पोहोचेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.





