मुंबई : महानगरपलिकेने हाती घेतलेले नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात निष्काळजीपणा आणि त्रुटी आढळून आल्यामुळे पालिकेने कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नालेसफाईतील हलगर्जीप्रकरणी वेगवेगळ्या कंत्राटदारांना एकूण ५४ लाख ६८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील नद्या आणि नाल्यांमधील गाळ काढण्यात येत आहे. मात्र, अनेकदा कंत्राटदारांकडून कामात हलगर्जीपणा केला जातो. परिणामी, मुंबईकरांना पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यंदा नालेसफाईचे काम अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने पार पाडावे, यासाठी पालिकेने नालेसफाईच्या कंत्राटात काही नव्या अटींचा समावेश केला आहे. मात्र, तरीही काही कंत्राटदारांकडून नालेसफाईच्या कामांत निष्काळजीपणा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. नालेसफाईत कोणताही निष्काळजीपणा होऊ नये यासाठी कामात हलगर्जी करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला.
मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांतील कंत्राटदारांना एकूण ५४ लाख ६८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पालिका प्रशासनाने शहर विभागातील नालेसफाई निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना ३१ लाख ६५ हजार दंड ठोठावला आहे. तसेच, पूर्व उपनगरात २२ लाख ५५ हजार तर, पश्चिम उपनगरातील कंत्राटदारांवर १० लाख ४८ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कंत्राटदारांकडून ज्यावेळी कामाचे बिल जमा केले जाईल, त्यावेळी बिलामधूनच दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.