मुंबई : दादारमधील भीषण बस अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबईत बेस्ट बसच्या आणखी एका अपघाताने खळबळ उडाली आहे. कांदिवलीतील पोईसर डेपोजवळ भरधाव बेस्ट बसने दोन पादचाऱ्यांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन तरुण जखमी झाले असून त्यापैकी एका २४ वर्षीय तरुणीची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचे फुटेजही समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात ८ जून रोजी सकाळी सुमारे ११.४० वाजण्याच्या सुमारास घडला. गोराई डेपोची बस रस्त्यावरून जात असताना तिने मागून दोन पादचाऱ्यांना धडक दिली. अपघाताच्या वेळी बसवर ईव्ही ट्रान्स कंपनीचा चालक आणि बेस्टचा वाहक कर्तव्यावर होते. धडकेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
या अपघातात सोनम मौर्य (२४) आणि आदर्श हिरालाल यादव (२४) हे दोघे जखमी झाले आहेत. अपघातानंतर बसच्या वाहकाने तत्काळ दोघांनाही उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल केले. सोनम मौर्य हिच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून ती अद्याप बेशुद्ध अवस्थेत आहे. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर आदर्श यादव याच्या खांद्याला आणि उजव्या डोळ्याजवळ किरकोळ दुखापत झाली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत बेस्ट बस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असून या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला की बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता, याचा तपास पोलिसांकडून केला जात असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील चौकशी सुरू आहे.







