ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली. तीन हात नाका, माजिवडा नाका, आनंद नगर, कासारवडवली, नागला बंदर नाका या संपूर्ण पट्ट्यात सुरू असलेली कामे आयुक्त राव यांनी पाहिली. पेपर कंपनीसमोरील पुल लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जलद काम करावे, असे निर्देश राव यांनी पुन्हा दिले.
महापालिका, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए यांच्यामार्फत रस्ते दुरुस्ती सुरू आहे. सेवा रस्ते वाहतूक योग्य स्थितीत आणण्यासाठी काम सुरू आहे. तसेच, कासार वडवली नाका येथील रस्ता मोकळा करण्यास सुरुवात झाली आहे. तिथे सुरू असलेले कामही राव यांनी पाहिले. मेट्रोच्या खालील रस्ते दुरुस्तीचे काम सुविहितपणे सुरू असून अधिकाअधिक बरिकेडीग काढण्यात आल्याची माहिती यावेळी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली. या पाहणी दौऱ्यात पोलीस उपायुक्त (वाहतूक) डॉ. विनयकुमार राठोड, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.