ठाणे : ठाणे जिल्ह्यातील काही विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीत झालेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘आपलं ठरलयं’ असे सांगत महायुतीचे उमेदवार निवडुन आणण्याचे आवाहन महायुतीच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना केले. कोणीही काही म्हणत असले तरी आपण महायुतीच्या उमेदवाराचेच काम करा आणि निवडून आल्यावर कार्यकर्त्यांना जपा, असा कानमंत्रही त्यांनी दिला. ठाणे येथील टिपटाॅप प्लाझा महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मला काही लोक येऊन विचारतात की, आपला कोणाला पाठिंबा आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की, कोणीही संभ्रमावस्थेत राहू नका. आपल्या उमेदवारांची निशाणी कमळ, धनुष्य आणि घड्याळ आहे. चौथी आपली कोणतीही निशाणी नाही. यामुळे महायुतीच्या उमेदवारांना निवडुण आणाण्याचे काम करा, असा कानमंत्र मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला.
‘आपलं ठरलयं, महायुतीचे वारे फिरलयं आणि महायुती जिंकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, असेही ते म्हणाले. कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहचून त्यांना आपल्या कामाबद्दल माहिती द्यावी. तसेच नागरिकांना सांगा की, मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे पाठविले आहे. तुम्ही आमच्यासाठी दहा मिनिटे देऊन मतदान करा आणि पाच वर्षे सेवा मिळवा, असा विश्वास माझ्यावतीने नागरिकांना द्या, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्याना दिला. खासदार आणि आमदार हे प्रत्येक घरापर्यंत पोहचू शकत नाहीत. महायुतीचा कार्यकर्ताच उमेदवाराचेे ब्रँडींग करतो आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन आपल्या पक्षाला मतदान करायला लावतो. त्यामुळे निवडुण आल्यावर आमदारांनी कार्यकर्त्यांना जपले पाहिजे. त्याच्या अडीअडचणी आणि प्रश्न सोडवावेत आणि त्यांच्या पाठिशी उभे रहावे, असे आदेशच त्यांनी उमेदवारांना दिले. कार्यकर्त्याकडे लक्ष दिले नाहीतर तोही आपल्याला लक्ष देणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, असेही ते म्हणाले. ठाणे जिल्ह्यात यापुर्वी प्रचाराला अधिक वेळ देत होतो. परंतु आता राज्यात सभा घ्यायच्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अधिक वेळ देता येणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी महायुतीचा बालेकिल्ला साबूत ठेवण्यासाठी काम करावे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यातील मतदार संघामधील महायुतीचा प्रत्येक उमेदवार प्रचारासाठी येण्यास सांगत होता. या प्रचार सभांमुळे आपल्याला कोपरी पाचपाखाडीतून लढता येणार नसल्याचे शिंदे यांनी राहुल शेवाळे आणि संजय निरुपम यांना सांगितले होते. तुम्ही फक्त अर्ज भरा. आम्ही स्वत:ला एकनाथ शिंदे समजू आणि तुमचा प्रचार करु, अशी विनंती मी आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांना केली. त्यानंतर शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी मेळाव्यात बोलताना दिली.