मुंबई : हवा प्रदूषणाच्या अनुषंगाने मास्कसंदर्भात प्रसारित झालेल्या वृत्तांबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेनं स्पष्टीकरण दिलं आहे. वातावरण बदलांमुळे बृहन्मुंबईसह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर सध्या विपरित परिणाम आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांमध्ये आणि समाजमाध्यमात वेगवेगळ्या स्वरूपाचे वृत्त प्रकाशित झाले आहे. या वृत्तांमध्ये नमूद केले आहे की, ‘नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने आवाहन केले आहे. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येते की, हवेची गुणवत्ता विपरित होत असल्याचे आढळल्यानंतर याअनुषंगाने शासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजनांविषयी कार्यवाही विचाराधीन आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मास्क वापरण्यासंदर्भात नागरिकांना कोणतेही आवाहन करण्यात आलेले नाही किंवा मार्गदर्शक तत्वेही अद्याप जारी करण्यात आलेली नाहीत.
त्यामुळे, प्रसारमाध्यमे व समाज माध्यमांमधून बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उल्लेख करुन प्रकाशित किंवा प्रसारित केलेले वृत्त निराधार व अयोग्य आहे, असे स्पष्ट करण्यात येत आहे. हवामान आणि तत्संबंधीत सर्व यंत्रणांशी बृहन्मुंबई महानगरपालिका समन्वय साधत असून त्यांच्याकडून प्राप्त निर्देशांनुसार यथोचित उपाययोजना, निर्णय, आदींची माहिती नागरिकांपर्यंत वेळोवेळी पोहोचविण्यात येईल, असे नम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेकडून ३० अँटी स्मोगिंग गन किंवा फोगिंग कॅनोन्स घेण्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. हिवाळ्याच्या दिवसात हवाप्रदूषण कमी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. ज्या भागामध्ये लोकसंख्येची घनता अधिक आहे, अशा ठिकाणी स्मोगिंग गन तैनात केल्या जाणार आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी देखील या संदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुंबई महापालिका ३० स्मोगिंग गन खरेदी करणार आहे. तर खासगी बांधकाम व्यावसायिकांनीं देखील स्मोगिंग गन खरेदी कराव्यात, अशा सूचना दिल्या देण्यात आल्या आहेत.