ठाणे : शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मोठा दिलासा ठरत असल्याचे चित्र ठाणे जिल्ह्यात दिसून येत आहे. आर्थिक वर्षात एकूण २ हजार ५१४ रुग्णांना सुमारे २१ कोटी ७४ लाख रुपयांची आर्थिक मदत या निधीतून वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून या योजनेत अनेक सकारात्मक बदल करण्यात आले असून, जिल्हास्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करणे, अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस करणे आणि अर्जांवर तातडीने निर्णय घेणे या गोष्टींमुळे योजनेची कार्यक्षमता वाढली आहे. यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे रुग्णालये, धर्मादाय संस्था आणि दाते यांच्याकडूनही मदतीचा हात पुढे येत आहे. या सुधारणांमुळे योजनेत पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेगही लक्षणीयरीत्या वाढला आहे, परिणामी अधिकाधिक गरजू रुग्णांना वेळेत उपचारांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध होत आहे.
या निधीतून कॉक्लियर इम्प्लांट, हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण, गुडघा व हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, केमोथेरपी-रेडिएशन, मेंदूविकार, डायालिसिस, अपघातग्रस्त रुग्ण, नवजात बालकांची शस्त्रक्रिया, भाजलेल्या रुग्णांचे उपचार अशा सुमारे २० गंभीर आजारांसाठी आर्थिक मदत दिली जाते. याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असून, सामाजिक दायित्व (CSR) अंतर्गत विशेष निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींवर मात करत गरजू बालकांना दर्जेदार उपचार मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभरात ४० हजार ७७६ रुग्णांना तब्बल ३३३ कोटी रुपयांहून अधिक मदत देण्यात आली, तर ठाणे जिल्ह्यातील २५१४ रुग्णांना सुमारे २१ कोटी ७४ लाख ५० हजार रुपयांचे सहाय्य वितरित करण्यात आले आहे. या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी आणि सविस्तर माहितीसाठी नागरिकांनी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.







