मुंबई : पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून दिंड्या-पालख्या निघाल्या आहेत. २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे. २८-२९ जूनला या सगळ्या दिंड्या चालत पंढरपुरात दाखल होतील. दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत शेकडो किलोमीटर अंतर पार करून पंढरपूरला जातात. परंतु या प्रवासादरम्यान अनेकदा वारकरी आजारी पडतात, दुखापतग्रस्त होतात, एखाद्या अपघातात किंवा दुर्घटनेत लोकांचा मृत्यू होतो. या सर्व वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने विमा संरक्षण दिलं आहे.
पंढरपूरच्या या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल.





