मुंबई : चित्रपट निर्मिती कंपनीच्या संचालकाने एक कोटी रुपयांची फसवणूक केल्यामुळे हरियाणातील एका व्यावसायिकाने वर्सोवा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आरोपी महिलेने तक्रारदाराला तिच्या वेब मालिकेच्या निर्मितीसाठी एक कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्या रकमेतून कोणतीही वेब सिरीज तयार न करता तक्रारदाराची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
तक्रारदार योगेशकुमार राहार (४०) हे मूळचे हरियाणातील रहिवासी आहेत. तक्रारीनुसार २०२२-२३ दरम्यान जेली बीन इंटरटेन्मेंट कंपनीच्या पांचाली चक्रवर्ती यांनी वर्सोवा येथील बंगल्यात बोलवून कब तक जवानी छुपाओगी रानी या वेब मालिकेत गुंतवणूक केल्यास ५० टक्के निर्मिती खर्च परतावा म्हणून देण्याचे आमीष दाखवले होते. त्यानुसार तक्रारदाराने ५ डिसेंबर २०२२ ते १ मे, २०२३ या कालावधीत एक कोटी रुपये रोख रक्कम व ऑनलाईन व्यवहारांद्वारे दिले. पण प्रत्यक्षात ती वेबमालिका तयारच झाली नाही व रकमेचा अपहार करण्यात आला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्याबाबत विचारणा केली असता आरोपी महिलेने खोट्या गुन्ह्यात अडवकण्याची धमकी दिली. अखेर याप्रकरणी योगेशकुमार यांनी वर्सोव पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी पांचाली चक्रवर्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.