डोंबिवली : येथील शिळफाटा रस्त्यावरील पलावा येथील एका गृहसंकुलातील तरुणीने ऑनलाईन माध्यमातून एका लग्नस्थळावर सुयोग्य वरासाठी नोंदणी केली होती. या नोंदणीच्या माध्यमातून या महिलेची ओळख एका तरुणाबरोबर झाली. मुलगा पसंत पडल्याने या तरुणीने गेल्या मार्चपासून या तरुणाबरोबर बोलणे, भेटीगाठी सुरू केल्या. दरम्यानच्या काळात या तरुणाने या तरुणीबरोबर शारीरिक संबंध ठेवले. नंतर विवाहास नकार देऊन तरुणीची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्या तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. पोलिसांनी तात्काळ संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शशांक राजपाल सिंग (२९, रा. राजसदन खैरी, ऋषिकेश, उत्तराखंड) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार तरुणी मनपसंत वराच्या शोधात होती. यासाठी तिला लग्नस्थळ नोंदणीसाठी तिच्या व्हाॅट्सअॅग्रुपवर एक जुळणी आली. यामध्ये लग्नस्थळ नोंदणीची सुविधा होती. या तरुणीने त्यामध्ये सुयोग्य वरासाठी नोंदणी केली होती. या लग्नस्थळावरील नोंदणीतून तक्रारदार तरुणीची आरोपी शशांक सिंग याच्याशी ओळख झाली. त्याने आपण नोकरदार असल्याचे तरुणीला सांगितले. गेल्या मार्चपासून तक्रारदार तरुणी, आरोपी शशांक यांचे नियमित मोबाईलवर बोलणे, भेटीगाठी सुरू होत्या. शशांकने तरुणीला लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तरुणी लग्नाचे नियोजन करत होती. लग्नविषयक बोलणी करण्यासाठी शशांक तक्रारदार तरुणीच्या पलावा येथील घरी आला होता. या कालावधीत त्याने तरुणीशी अश्लिल संभाषण केले. तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. नंतर तरुणीने आपण लग्न कधी करायचे यासाठी तरुणामागे तगादा लावला. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तिने त्याचा पिच्छा सोडला नाही. त्यानंतर मात्र आरोपी शशांक याने पीडित तरुणीला प्रतिसाद देणे बंद केले. शशांकने आपली फसवणूक केली असल्याचे तरुणीला जाणवले. त्यानंतर तिने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक निशा चव्हाण याप्रकरणाचा तपास करत आहेत.