नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे गणेश देशमुख यांनी स्विकारल्यामुळे तत्कालिन सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांच्याकडील असलेली सर्व विभाग देशमुख यांना सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (एम.डी.) विजय सिंघल यांनी सोपविली आहेत. सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नवी मुंबई विमानतळ प्रकल्प वेळीच पुर्ण कऱण्यासाठी कंबर कसली आहे. महिन्यातून एक पाहणी दौरा विजय सिंघल हे करत असून ते विमानतळासाठी सूरु असलेल्या कामाचा नित्याने आढावा घेत आहेत. मार्च २०२५ पर्यंत विमानतळाचे पहिल्या टप्यातील काम पुर्ण होईल असे सिडकोचे नियोजन आहे. विमानतळ प्रकल्पाचे काम सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांच्या देखरेखीखाली सूरु आहे.
तत्कालिन सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांच्या जागी देशमुख यांची नियुक्ती झाल्याने व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांनी कोणताही बदल न करता देशमुख यांच्याकडे शिंदे यांच्याकडील सर्व विभागाची देखरेख करण्याची जबाबदारी दिली आहे. देशमुख यांच्याकडे सिडकोच्या तीनही वसाहतींचा शहर सेवा विभागासोबत (एमटीएस १ ते ३ वसाहतींचा परिसर) तसेच भूमी व भूमापन विभाग, सिडकोचा सर्वात महत्वाचा वाणिज्यिक प्रकल्प पणन विभाग, सामाजिक सेवा विभाग, पुनर्वसन, आर्थिक व सांख्यिकी विभाग, विमानतळ व नवी मुंबईच्या विस्तारासाठी लागणारी भूसंपादन, पाणी पुरवठा, मलनिसारण (उदंचन केंद्र) यांच्या संदर्भातील प्रकल्प, पालघर नवीन शहर विकास प्रकल्प, नवी मुंबई सेझ, नवी मुंबई महापालिकेसोबत सिडको मंडळाचे समन्वयक, नगरविकास भवन, उलवे येथील युनिटी मॉलचा प्रकल्प, ठाणे ते नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचा थेट मार्ग, मानखुर्द ते नवी मुंबई मेट्रो मार्गिकेचा प्रकल्प, या प्रकल्पांची मुख्यता जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच सरकारी संदर्भ तसेच संसदीय कार्य आधिवेशनातील प्रश्नांवर सिडकोची भूमिका स्पष्ट करण्याची महत्वाची जबाबदारी देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.