मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईसह देशभरात सायबर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर गुन्ह्याची उकल करणे पोलिसांसमोर आव्हान असते मात्र मुंबईच्या अंधेरी पोलिसांनी अशा दोन सायबर गुन्हेगारांना मध्यप्रदेश येथील कटरा भागातून अटक केली आहे. या दोघांनी फिर्यादींना माल पुरवठा करणाऱ्या कंपनीचा ईमेल आयडी आणि बँक अकाउंट नंबर बदलला असून खात्यात रोख रक्कम मागून फिर्यादींची फसवणूक केली. पोलिसांनी याप्रकरणी दोन सायबर गुन्हेगारांना बम्हणी बंजर, कटरा हा नक्षलग्रस्त प्रभावित भागातून अटक केली. निरज राजेंद्र राठोर, धर्मेंद्र सुदर्शन पांडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. अंधेरी पोलिसांनी गुन्ह्यात फसवणूक झालेली एकुण ७,४३,०९६/- रूपये इतकी रक्कम गोठवली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच ती फिर्यादींना परत दिली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी २०२३ रोजी फिर्यादी यांच्या मेल आयडीवर त्यांना माल पुरवठा करणाऱ्या गांधी कंपनीच्या ईमेलवरून कंपनीचे बँक खात्यात बदल झाला असून निरज राठौर यांच्या खात्यात ऑनलाईन ८,३०,५२१/- रूपये पाठविण्यास सांगितले. फिर्यादींनी विश्वास ठेवून सांगितलेली रक्कम मिरज यांच्या खात्यात पाठवून दिले. मात्र आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात येतात फिर्यादी यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीनुसार कलम ४१९, ४२० भा.दं.वि सह कलम ६६ (क(, ६६(ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचा तपास वपोनि संताजी घोरपडे, पो. नि. गुन्हे बालाजी दहिफळे, मपोनि गुंडरे (सायबर अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि तोडकर (सायबर अधिकारी), पो.ह. सुर्यवंशी पो.ह.चव्हाण, पो.ह.भोसले, पोशि नरबट, मपोशि गोम्स, लबडे व पोशि सुदीप शिंदे तांत्रिक मदत पो.ह. पिसाळ या पथकाने बालाघाट तसेच मंडला या नक्षलग्रस्त जिल्हयामध्ये जावून गुन्ह्यातील दोन्हीही आरोपींना स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली. दोन्ही आरोपींकडे अधिक चौकशी केली असता तपासा दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.