मुंबई : गेल्या वर्षी जून महिन्यात महाराष्ट्राने सूरत-गुवाहाटीचा प्रवास करून राज्यात सत्तांतर झालेल्या नाट्याचा पहिला प्रवेश अनुभवला होता. त्यानंतर गेले वर्षभर न्यायालयीन लढाया, निवडणूक आयोगातील संघर्ष सुरू आहे. असे असतानाच राज्याच्या सत्तानाट्याचा पुढील प्रवेश सादर झाला. गेल्या काही महिन्यांपासून नाराजीची चर्चा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी राजभवनावर जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पवार यांच्याबरोबर इतर आठ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याने पक्षातील मतभेद उघड झाले असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सत्तेत सहभागी झालेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
‘अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी पक्षाच्या धोरणाविरोधात पाऊल उचलले असल्याने त्यांची कृती बेकायदेशीर आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेऊन केलेली कृती आहे. एका सदस्याने याची तक्रार केली असून ती राष्ट्रवादीच्या शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आली आहे. आज आम्ही सर्व माहिती घेऊन प्रक्रिया सुरू केली आहे. नऊ आमदार म्हणजे संपूर्ण पक्ष नव्हे. त्यामुळे सत्तेत सहभागी झालेल्या नऊ आमदारांना आता अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंबंधी आम्ही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मेल केला असून त्यांनी आम्हाला लवकरात लवकर बोलवावं,’ असं जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. दरम्यान, शरद पवार आणि जयंत पाटलांकडून अजित पवारांसह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधात कठोर पाऊल उचलण्यात आल्याने राष्ट्रवादीतील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.