पालघर : परिवहन आयुक्त विभागाने प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्तव्यावर असणारे मोटर वाहन निरीक्षक व साहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांना अंगावरील गणवेशावर ‘बॉडी वॉर्न कॅमेरे’ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्तव्यावर असणारे कर्मचारी-अधिकारी यांना नागरिकांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाविषयीचा ठोस पुरावा उपलब्ध होऊन कारवाई करणे सोपे जाणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायू पथकाकडून अचानक तपासणी मोहीम आखून वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र काही वाहनधारक किंवा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती मोटर वाहन निरीक्षक किंवा साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अशा तपासणी अधिकाऱ्यांवर हल्ले करतात, अनेकदा शाब्दिक चकमक होते. कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना अपमानास्पद, अरेरावीची वागणूक दिली जाते. अशा व्यक्तींवर कारवाई करताना अनेकदा अडचणी येतात.
या अडचणींवर मात करण्यासाठी प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन विभागातील मोटर वाहन निरीक्षक व साहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांना अंगावर परिधान करण्यासाठी ‘बॉडी वॉर्न कॅमेरा’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांबरोबर शाब्दिक बाचाबाची करणाऱ्या तसेच अपमानास्पद वागणूक देणाऱ्या, अरेरावी, दमदाटी करणाऱ्या तसेच हुज्जत घालून गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींचे या ‘बॉडी कॅमेरा’द्वारे चित्रीकरण होणार आहे. हे चित्रीकरण हा मोठा पुरावा म्हणून उपयोगी पडणार आहे. देशातील वाहतूक पोलिसांना या आधीच बॉडी कॅमेरे देण्यात आले आहेत. आता अशा स्वरूपाचे कॅमेरे राज्यातील एक हजाराहून अधिक मोटर वाहन निरीक्षक व तेवढेच साहाय्यक मोटर निरीक्षक यांना दिले जाणार आहेत.
बॉडी वॉर्न कॅमेरामुळे कर्तव्यावर असणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लोकांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाविषयीचा ठोस पुरावा उपलब्ध होणार आहे. अशा व्यक्तींवर कारवाई करणेही सोपे जाणार आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांबरोबर वाद घालणाऱ्यांनी आता सावध होणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांबरोबर वाद घालणाऱ्यांना सरकारने याद्वारे इशाराच दिला आहे.