पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक पोलिसांनी मुंढवा, कोरेगाव पार्क, येरवाडा, विमाननगरसह शहरातील वेगवेगळ्या भागात नाकाबंदी करून ८५ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. मध्यरात्रीनंतर शहरात होणारे अपघात, तसेच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आता अचानक नाकाबंदी करण्यात येणार आहे. कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुणासह त्याच्या मैत्रीणीला धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. अल्पवयीन मोटारचालक मुलगा मित्रांसोबत पार्टी करून कल्याणीनगर भागातून निघाला होता. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी मध्यरात्री वाहतुकीचे नियम धुडकावून भरधाव वेगाने वाहन चालविणारे, तसेच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. वाहतूक पोलीस, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री बारानंतर पहाटेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात नाकाबंदी केली.