कोल्हापूर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा लक्षात घेता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली. यानंतर केंद्र सरकार २ हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल दराने नाफेड मार्फत शेतकऱ्यांचा दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. मात्र सदर माहिती जाहीर करण्याआधिच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जापानमधून ट्विट केले, आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच कांदा २ हजार ४१० प्रतिक्विंटल या दराने खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती ट्विटद्वारे दिली. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत आपले कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजपचा विश्वास नव्हता का असा सवाल केला. तसेच फक्त क्रेडीट घेण्यासाठीच भाजपने ही खेळी केली, फडणवीस यांनी जापानमध्ये बसून ते ट्विट केले असा थेट आरोपही यांनी केला.
कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावल्याच्या विरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यात जोरदार आंदोलन केले. राज्यातील महत्त्वाच्या १५ एक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याचा लिलाव बंद पाडला. गेली तीन एक दिवस हे लिलाव बंद आहेत. त्यामुळे ७० ते ८० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. दरम्यान जापानमधून ट्विट केलेल्या माहितीमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून कांदा उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळेल. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी फडणवीस यांनी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क साधला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी ट्विटद्वारे दिली.