मुंबई : लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहेत. कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी देखील लोकलने प्रवास करतात. मुंबई शहर व शहरालगतचे प्रदेश लोकलने जोडण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत. रेल्वे प्रशासनाने अलीकडेच, गोरेगाव ते कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. ते काम कुठपर्यंत झालंय व मार्गिका कधी सुरू होणार, याबाबत पश्चिम रेल्वेने माहिती दिली आहे. त्यामुळं प्रवाशांना प्रवास करणे आणखी सोयीस्कर होणार आहे. गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचा ४.७ किमीचा पहिला टप्पा लवकरच खुला करण्यात येणार आहे. त्यासाठी मालाड, कांदिवली रेल्वे स्थानकात मार्गिकेचे काम सुरू आहे. कांदिवलीपर्यंत जूनअखेर सहावी मार्गिका रेल्वे वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे. तसंच, १५ मे पर्यंत पश्चिम रेल्वेवर आणखी एसी लोकल वाढवण्यात येणार आहे. त्यामुळं उष्णतेच्या या दिवसांत प्रवाशांना गारेगार प्रवास अुनभवता येणार आहे. तसंच, गोरेगाव-कांदिवलीदरम्यान रेल्वे मार्गिका पूर्ण झाल्यास नागरिकांना आणखी वाढीव फेऱ्या मिळणार आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव- कांदिवली पर्यंतचा ४.५ किमी लांबीचा मार्ग जवळपास तयार आहे. तसंच, भूसंपादनाच्या काही तक्रारी दूर झाल्यास यावर्षातच नोव्हेंबरपर्यंत बोरीवली पर्यंत सहावी मार्गिका सुरू होऊ शकते. नोव्हेंबर २०२३ मध्ये खार ते गोरेगावपर्यंत सहावी मार्गिका सुरू झाली होती. कांदिवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेसाठी एकूण १२ पूल उभारण्यात येणार आहेत. यापैकी आठ रेल्वे पुलांचे काम पूर्ण झाले असून ४ पुलांचे काम पुढील महिन्यात पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर सिग्नलिंगचे काम जवळपास ७० टक्के काम आणि ओव्हरहेड वायरचे काम ३० टक्के पूर्ण झाले आहे. बोरीवली ते मुंबई सेंट्रलदरम्यान ३० किमीपर्यंतची सहावी मार्गिका तयार होत आहे. लोकल ट्रेन मेल-एक्स्प्रेसपासून वेगळ्या ठेवण्यासाठी पाचव्या व सहाव्या मार्गिका तयार करण्यात येत आहे. गोरेगाव ते कांदिवली असा ४.५ लांबीचा मार्ग जवळपास तयार झाला आहे. सहावी मार्गिका बोरीवलीपर्यंत सुरू झाल्यास पश्चिम रेल्वेची क्षमता २० टक्क्यांनी वाढणार आहे. मुंबई सेंट्रल ते बोरीवलीदरम्यान दोन धीम्या आणि दोन जलद मार्गिका आहेत. मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसहून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या मेल एक्स्प्रेस या पाचव्या मार्गिकेवरुन रवाना होतात. एकाच मार्गिकेवरुन मेल-एक्स्प्रेस चालवल्या जातात. शक्यता जलद मार्गिकेचा वापर होतो. यामुळं लोकल फेऱ्यावर परिणाम होतो. लोकल विलंबाने धावतात यासाठीच 30 किमी लांबीच्या सहाव्या मार्गिका उभारणीचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.