मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान होणारा विनातिकीट प्रवास, नियमभंग, अनधिकृत वावर आणि प्रवाशांना होणारा त्रास रोखण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वे कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरील किमान दंडाची रक्कम २५० रुपयांवरून थेट ५०० रुपये करण्याची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेतील शिस्त, सुरक्षा आणि महसूल संरक्षण या उद्देशाने हे बदल करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावामध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. महिला राखीव डब्यांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या पुरुष प्रवाशांवर आता अधिक कठोर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात, आसनावर किंवा शयनिकेवर बेकायदेशीररीत्या बसलेल्या पुरुष प्रवाशांकडून २ हजार ५०० रुपयांपर्यंत दंड वसूल केला जाऊ शकतो. याशिवाय रेल्वे स्थानक परिसरात किंवा गाड्यांमध्ये विनापरवाना फेरीवाला व्यवसाय करणारे तसेच भीक मागणाऱ्या व्यक्तींवरही कठोर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
माहितीनुसार, रेल्वे कायद्यातील या सुधारणांना मंजुरी मिळाल्यानंतर देशभरातील सर्व रेल्वे विभागांना त्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासन नवीन नियमांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे. या बदलांमुळे रेल्वे स्थानके आणि गाड्यांमधील अनधिकृत गर्दी कमी होण्यास मदत होईल, तसेच नियमितपणे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवीन प्रस्तावित नियमांनुसार विनातिकीट किंवा अवैध प्रवास करणाऱ्यांना किमान ५०० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरील तिकीट वापरून प्रवास करणाऱ्यांचे तिकीट जप्त करून त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्कासह दंड वसूल केला जाईल. रेल्वे स्थानक किंवा गाड्यांमध्ये विनापरवाना फेरीवाला व्यवसाय करणाऱ्या तसेच भीक मागणाऱ्या व्यक्तींना २ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. वारंवार नियमभंग करणाऱ्यांवर कारावासाची कारवाईही होऊ शकते. याशिवाय सहप्रवाशांना त्रास देणे, शिवीगाळ करणे, सार्वजनिक सुव्यवस्था भंग करणे किंवा रेल्वेच्या कामकाजात अडथळा निर्माण करणे यांसारख्या प्रकारांवर १ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. मद्य किंवा अमली पदार्थांच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच ज्वलनशील, धोकादायक किंवा प्रतिबंधित वस्तू रेल्वेमधून वाहून नेणाऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे की, या उपाययोजनांमुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवासीहिताचा होण्यास मदत मिळेल. प्रवाशांनी रेल्वेच्या नियमांचे पालन करून जबाबदारीने प्रवास करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.






