बीड : बीड जिल्ह्यातून सतत गुन्हेगारीच्या बातम्या समोर येत आहेत. आता बीड शहरातील चऱ्हाटा फाटा येथे कारमधून व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी धडक कारवाईक करत दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी दीड कोटी रुपयांच्या जवळपास किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शिवाजीनगर पोलिसांना माहिती मिळाली होती की, सोन्यापेक्षाही महाग समजल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणारे दोघे बीड शहरात येत आहे. या गोपनीय माहितीच्या आधारे शहरानजीकच्या एका हॉटेलजवळ, चऱ्हाटा फाटा येथे सापळा रचण्यात आला. या दरम्यान दोघांना तातडीने ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत शैलेंद्र प्रभाकर शिंदे आणि विकास भीमराव मुळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या दोघांकडून दीड किलोच्या जवळपास वजनाची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. बाजारभावानुसार जप्त करण्यात आलेल्या व्हेल माश्याची उलटीची किंमत दीड कोटी रुपयांच्या जवळपास आहे. या उलटी वनविभागाकडून प्राथमिक तपासणी करण्यात आली असून, पुढील तपासणीसाठी ती आता प्रयोगशाळेत पाठवली जाणार आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक बांगर यांनी सांगितले.







