वृत्तसंस्था : आशिया कप २०२५ च्या अगोदरच बीसीसीआयमध्ये मोठी उलथापालथ दिसत आहे. रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, पुढील निवडणुकीपर्यंत उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडे कार्यवाहक अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयच्या घटनेनुसार, वयाच्या ७० व्या वर्षानंतर कोणत्याही अधिकाऱ्याला आपले पद सोडावे लागते. याच कारणामुळे रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बीसीसीआयच्या पुढील अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक २८ सप्टेंबरला होणार आहे. त्याच दिवशी नव्या अध्यक्षांची निवड होईल. मात्र त्याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय क्रिकेटचा माजी महान फिरकीपटू अनिल कुंबळे याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड होणार असल्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. तसेच भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरच्या नावाची देखील चर्चा आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नेमकी कोणाची निवड होणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
कोण आहे अनिल कुंबळे?
अनिल कुंबळे हे भारताचे माजी क्रिकेटपटू, कर्णधार आणि प्रशिक्षक असून क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंमध्ये त्यांचा समावेश होतो. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक आणि समालोचक म्हणून काम करायला सुरुवात केली आहे. १८ वर्षांच्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये ते १३२ कसोटी सामने आणि २७१ एकदिवसीय सामने खेळले. कसोटी सामन्यांच्या इतिहासामध्ये भारताकडून खेळणाऱ्या सर्वात्कृष्ट फिरकीपटूंपैकी एक आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ६१९ गडी बाद केले आहेत, तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांनी ३३७ बळी घेतले होते. १९९३ मध्ये त्यांची ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून निवड झाली होती. २०१६ ते २०१७ पर्यंत ते भारताच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते.







