वृत्तसंस्था : आधार कार्डाच्या भौतिक (Physical) छायाप्रती गोळा करून ठेवण्यास हॉटेल, कार्यक्रम आयोजक आणि अशाच इतर संस्थांना प्रतिबंध करणारा एक नवीन नियम लवकरच जारी केला जाणार आहे. आधार कार्डाच्या छायाप्रती जमा करून ठेवण्याची ही पद्धत सध्याच्या आधार कायद्याचे उल्लंघन करते. याबाबत UIDAI कडून लवकरच नवीन नियम जारी केला जाईल.
UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांच्या माहितीनुसार, आधार प्राधिकरणाने एका नवीन नियमाला मान्यता दिली आहे. यानुसार, आधार आधारित सत्यापन करणाऱ्या संस्थांना या प्रणालीमध्ये नोंदणी करणे आवश्यक असेल. या नवीन प्रणालीमुळे कागदावर आधारित आधार पडतालणीला परावृत्त करणे हा उद्देश आहे. आधार प्राधिकरणाने नवीन नियमाला मान्यता दिली असून, तो लवकरच अधिसूचित केला जाईल. कुमार यांनी सांगितले की, ही नवीन प्रणाली क्यूआर कोड स्कॅन करून किंवा सध्या विकसित होत असलेल्या नवीन आधार मोबाईल ॲपद्वारे सत्यापन करण्याची सुविधा देईल. कुमार यांनी जोर देऊन सांगितले की, सत्यापनाची ही सुधारित चौकट गोपनीयता संरक्षणात सुधारणा करेल आणि कागदावर आधारित आधार हाताळणीशी संबंधित धोके दूर करेल. कुमार म्हणाले, “यामुळे कागदाचा वापर न करता ऑफलाइन सत्यापनात सुलभता येईल, त्याचबरोबर वापरकर्त्यांची गोपनीयता राखली जाईल आणि त्यांच्या आधार डेटाचा गैरवापर होण्याचा धोका दूर होईल.”







