मुंबई : विद्यार्थ्यांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील सर्व शाळांच्या ५०० मीटर परिसरात ऊर्जा पेयांच्या (Energy Drinks) विक्रीवर निर्बंध घालण्यात येणार असल्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत केली. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्यावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. सभागृहात बोलताना आमदार पाचपुते यांनी एका ऊर्जा पेयाची बाटली दाखवत त्यावरील सूचना वाचून दाखवल्या. संबंधित उत्पादनाच्या लेबलवर ते लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी योग्य नसल्याचा उल्लेख असताना अशा पेयांची शाळांबाहेर सहज विक्री कशी सुरू आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच तंबाखूजन्य पदार्थांप्रमाणेच या पेयांची विक्रीही विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर ठेवण्यासाठी राज्यव्यापी निर्बंध लागू करण्याची मागणी त्यांनी केली. ऊर्जा पेयांमध्ये कॅफिन, टॉरिन आणि साखरेचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, हृदयाचे ठोके वाढू शकतात तसेच मानसिक अस्वस्थतेसारखे दुष्परिणाम संभवू शकतात, असेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय अशा पेयांची ऑनलाईन विक्रीही सहज उपलब्ध होत असल्याने त्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची तसेच ऊर्जा पेयांसाठी स्पष्ट धोरण आखण्याची मागणी त्यांनी केली.
उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. ऊर्जा पेयांमध्ये असलेले काही घटक लहान मुलांसाठी हानिकारक ठरू शकतात, त्यामुळे शाळांच्या ५०० मीटर परिसरात अशा पेयांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच केवळ विक्रीवर नियंत्रण ठेवणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये या पेयांच्या संभाव्य दुष्परिणामांबाबत जनजागृती करणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यासाठी राज्यातील शाळांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना ऊर्जा पेयांच्या अति सेवनामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक परिणामांची माहिती दिली जाणार आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन तसेच शालेय शिक्षण विभागाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलेल, असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले.







