कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमातील कामगारांना लवकर जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे. परिवहन कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांनी ही माहिती दिली आहे. परिवहन कामगार कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आयुक्त इंदूराणी जाखड यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी संघटनेला आश्वासन दिले आहे. त्यामुळेच आता केडीएमटी च्या कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षे प्रलंबित असलेला जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाच्या कामगारांना जूनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. जुनी पेन्शन लागू होण्यासाठी परिवहन कर्मचारी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत पाठपुरावा करत आहे. यासंदर्भात तत्कालीन महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याशी बैठकीत चर्चा देखील करण्यात आली होती. त्यांनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी पेन्शन लागू केली जाईल, असे आश्वासन निवडणूकीपूर्वीच दिले होते. त्यानंतर निवडणूक आचार संहितेमुळे हा विषय लांबणीवर गेला होता. त्यानंतर आज पुन्हा या संदर्भात विद्यमान आयुक्त जाखड यांची भेट घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत परिवहन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पाटील यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर जून्या पेन्शन योजनेतील त्रूटी दूर करुन त्याचा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाईल. सरकारकडून या प्रस्तावाला मंजूरी मिळताच जुनी पेन्शन योजना लागू होईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.