नव्वी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत भाजपवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री बनवतात, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. केजरीवाल दिल्लीच्या विधानसभेमध्ये बोलत होते. अरविंद केजरीवाल यांनी यावेळी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपकडून सरकारी यंत्रणांचा गैरउपयोग होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. सरकारी यंत्रणाचा वापर करताना भाजपला लाज वाटत नाही का? असा बोचरा सवाल देखील अरविंद केजरीवाल यांनी केला. अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी चार पाच दिवसांपूर्वी मोहन भागवत यांना पत्र लिहिलं होतं. त्यात मी पाच मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यात एक मुद्दा असा आहे की, पंतप्रधान मोदी सरकारी यंत्रणांची भीती दाखवून भ्रष्ट नेत्यांना आपल्या पक्षात घेत आहेत. मोहन भागवत याच्याशी सहमत आहेत का?
२७ जून २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की, अजित पवार यांनी ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यांना आम्ही तुरुंगात पाठवणार. पाच दिवसांनी २ जुलै रोजी त्यांना भाजपमध्ये सामील करून घेण्यात आले आणि त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. मला भाजपला विचारायचं आहे, त्यांना लाज वाटत नाही का? तुम्ही काय तोंड घेऊन घरी जाता, असं म्हणत केजरीवाल यांनी जोरदार शाब्दिक प्रहार केला. २२ जुलै २०१५ रोजी भाजप म्हणाली होती की, हेमंत बिस्व शर्मा सर्वात मोठे भ्रष्टाचारी आहेत. एक महिन्यानंतर २३ ऑगस्ट २०१५ ला त्यांना आपल्या पार्टीत घेण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर सीबीआय आणि ईडीने गुन्हा दाखल केला होता. पंतप्रधान मोदींनी तो गुन्हा बंद करून टाकला, असं केजरीवाल म्हणाले, घोटाळा गेलेले २५ ‘नगीने’ आता मोदींचे नगीने झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली. प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी, ईओडब्ल्यूचा गुन्हा होता, दोन्ही बंद झाले. हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीचा गुन्हा होता, तो पण आता थंड बस्त्यात गेला आहे. भावना गवळी यांच्यावर देखील आरोप होता, यशवंत जाधव, सीएम रमेश, रविंदर सिंह, संजय सेठ, सुवेंदू अधिकारी, के गीता, छगन भुजबळ, कृपा शंकर सिंह, दिगंबर कामत, अशोक चौहान, नवीन जिंदल, तपस रे, अर्चना पाटिल, गीता कोड़ा, बाबा सिद्दिकी, ज्योति मिंडा, सुजाना चौधरी अशा सर्व नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप आहेत. लाल किल्ल्यावरून लोकांना खेड्यात काढताना लाज वाटत नाही का? अशी कडवट टीका त्यांनी केली.