वसई : वेगवेगळ्या घटनेत आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन महिलांना नायगाव पोलिसांनी तत्परतेने मदत करून वाचविण्यात यश मिळवले. मागील पंधरा दिवसात या घटना घडल्या. ११२ या नियंत्रण कक्षाला आलेल्या दूरध्वनीवरून माहिती मिळाताच पोलीस शिपाई संतोष घुगे यांनी दोघींचे प्राण वाचवले. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाराम पालकर यांनी गळफास घेतलेल्या महिलेला वैद्यकीय उपचार देऊन तिचे प्राण वाचवले. बुधवार १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ च्या सुमरास नायगावच्या परेरानगर येथील रेड रोज इमारतीमध्ये राहणारी १६ वर्षीय तरुणी घरातील पंख्याच्या सिलिंगला दुपट्टा बांधून वॉशिंग मशीनवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. पोलिसांच्या ११२ हेल्पलाईन क्रमांकावर ही माहिती मिळाली. पोलीस शिपाई संतोष घुगे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या मुलीने घराच्या दरवाजाला आतून कडी लावली होती. मात्र घुगे यांनी प्रसंगावधान दाखवून घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला. ही मुलगी वॉशिंग मशीनवर चढून आत्महत्येच्या प्रयत्नात होती. पोलिसांनी तिला थांबवून तिचे समुपदेशन करून तिला आत्महत्येपासून प्रवृत्त करून तिचे प्राण वाचवले. सदर मुलीला तिच्या आईने घरगुती कारणावरून ओरडल्यामुळे तिने सदरचे पाऊल उचलले होते.
अशीच एक घटना रविवार १ सप्टेंबर रोजी घडली होती. नक्षत्र प्राइड इमारत येथे राहणार्या एका दाम्पत्यामध्ये जोराचे भांडण सुरू असून तुम्ही तात्काळ मदत करा, असा कॉल सदर भांडणातील महिलेच्या भावाने उत्तर प्रदेश येथून ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर केला. कर्तव्यावरील पोलीस शिपाई संतोष घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या बिल्डिंगच्या खाली लोक जमा झालेले व घरातून भांडणाचा आवाज येत होता. घुगे यांनी आत घरात प्रवेश केला असता ३७ वर्षीय महिला गॅलरीकडे पळत जाऊन १३ व्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. मात्र घुगे यांनी चातुर्याने प्रसंगावधान दाखवून सदर महिलेचे केस पकडून तिला उडी मारताना पकडले आणि तिला वाचवले. शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी जूचंद्र येथील म्हात्रेवाडी चाळीत रात्री २४ वर्षीय विवाहित महिलेने कौटुंबिक वादातून गळफास लावल्याची माहिती रात्रगस्त अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाराम पालकर यांना मिळाली होती. पालकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिचे शरीर थंड पडले होते. ती बोलण्याच्या स्थितीत नव्हती. पालकर यांनी तात्काळ सदर महिलेला खाजगी वाहनांमध्ये रुग्णालयात दाखल केले. तीन दिवस उपचारानंतर महिलेचे प्राण वाचले. पालकर यांनी वेळीच वैद्यकीय उपचार दिले नसते तर महिलेचे प्राण वाचले नसते.