पुणे : कर कमी करावा अन्यथा निवडणुकांवरती बहिष्कार घालू असा निर्णय ३२ गाव कृतीसमितीने घेतला आहे. ‘गाव विकणे आहेत’ अशा आशयाचे बॅनर ३२ गावांमध्ये लावण्यात आले आहेत. पुण्यातील ३२ गावांमध्ये लागलेले बॅनर सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. पुणे महानगर पालिकेचा जुलमी कर भरू शकत नसल्यामुळे ग्रामस्थांनी गाव विकण्यासाठी काढले आहे. अशामध्ये आता जर कर कमी नाही केला तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या ग्रामस्थांनी घेतला आहे. पुणे महापालिकेच्या आवाजवी कर धोरणामुळे ३२ गावातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. महापालिकेचा जुलमी कर भरू शकत नसल्याने आमचे गावच महापालिकेने विकत घ्यावे अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी ३२ गावांच्या ग्रामस्थांनी ‘गाव विकणे आहे’ अशा प्रकारच्या जाहिराती गावोगावी लावत पुणे महापालिकेचा निषेध व्यक्त केला आहे.
पुणे महापालिकेने कोणत्याही सुविधा न पुरवता, टॅक्स मात्र भरमसाठ लावलेला आहे या पार्श्वभूमीवर ‘आम्ही टॅक्स भरू शकत नाही, तुम्ही आमचे गावच विकत घ्या.,अशी भूमिका ३२ गावातील ग्रामस्थांनी घेतली आहे. टॅक्स या विषयांवरून ३२ गावातील नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यासाठी पुढील मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू केली असून महानगरपालिकेला टाळं ठोकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय. पुण्यातील धायरी, नन्हे, आंबेगाव किरकटवाडी, नांदोशी, खडकवासला नांदेड, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे, कोपरे यासह ३२ गावांचा यामध्ये समावेश आहे. या गावांमध्ये सर्वच ठिकाणी गाव विकण्याबाबतचे बॅनर्स लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे महानगर पालिकेत समाविष्ट असणाऱ्या या ३२ गाव कृती समिती पालिकेविरोधात चांगलीच आक्रमक झाली असून आता गावकऱ्यांनी थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.