मुंबई : राज्यातील अंगणवाडीतील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच पोषण आहारामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून पोषणमूल्यांसोबतच चवीलाही प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी नवीन आणि अधिक रुचकर पाककृतींचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत राज्यातील ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना पुरविण्यात येणाऱ्या घरपोच आहारासंदर्भात मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीदरम्यान मंत्री तटकरे यांनी स्वतः पोषण आहाराच्या गुणवत्तेची तपासणी केली. बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख, आयुक्त डॉ. जगदीश मणियार, सहसचिव वी. आर. ठाकूर, अवर सचिव सुनील सरदार, प्रसाद कुलकर्णी, सह आयुक्त वर्षा पवार, उपायुक्त संगीता लोंढे, विजय क्षीरसागर, जामसिंग गिरासे यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाच्या निकषांनुसार सध्या घरपोच आहार प्रीमिक्स स्वरूपात वितरित केला जातो. मात्र, लाभार्थ्यांकडून प्राप्त झालेला प्रतिसाद, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या सूचना तसेच तज्ज्ञांच्या शिफारशी लक्षात घेऊन या आहारामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. सध्या दिल्या जाणाऱ्या ‘एनर्जी डेन्स मूग डाळ खिचडी प्रीमिक्स’मधील घटकांचे मिश्रण अधिक संतुलित करण्यात आले असून आहाराचा दर्जा आणि चव टिकवून ठेवण्यासाठी मसाल्याचे पाकीट स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ‘मल्टी मिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स’ ही विद्यमान पाककृती कायम ठेवण्यात आली आहे.
याशिवाय लाभार्थ्यांच्या पसंतीचा विचार करून ‘व्हेज पुलाव’ आणि ‘मल्टीग्रेन पफ’ या दोन नवीन पाककृतींचा घरपोच आहारामध्ये समावेश करण्यात आला आहे. या बदलांमुळे लाभार्थ्यांना अधिक पौष्टिक, संतुलित आणि चविष्ट आहार उपलब्ध होणार असून त्यांच्या आहारातील विविधताही वाढणार आहे. सर्व पाककृतींमध्ये केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार आवश्यक उष्मांक, प्रथिने तसेच सूक्ष्म पोषकतत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य शासन कुपोषणमुक्त महाराष्ट्राच्या उद्दिष्टासाठी सातत्याने विविध उपाययोजना राबवत असून गेल्या तीन वर्षांत कुपोषणाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचेही मंत्री तटकरे यांनी सांगितले. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या पाककृतींमुळे लाभार्थ्यांची आहाराबाबतची स्वीकृती वाढेल आणि पोषणपूरक आहाराचा प्रभाव अधिक परिणामकारक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आहारातील बदलांविषयी माहिती देताना महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी सांगितले की, कोणतेही बदल करण्यापूर्वी राज्यभर व्यापक सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, आहारतज्ज्ञ तसेच विविध विशेषज्ञ संस्थांची मते विचारात घेण्यात आली. तसेच क्षेत्रीय यंत्रणांशी सविस्तर चर्चा करून लाभार्थ्यांच्या गरजा आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. या प्रक्रियेनंतरच नवीन पाककृतींची निवड करण्यात आली असून त्यांना लाभार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोषणमूल्ये, गुणवत्ता आणि चव यांचा समतोल साधणाऱ्या या सुधारित आहार व्यवस्थेमुळे राज्यातील बालके, माता आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्यवृद्धीस मोठी मदत होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.







