नवी मुंबई: अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहेत. त्यातच गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद-ए-मिलादनिमित्त काढण्यात येणारे जुलूस एकाच दिवशी निघणार असल्याने पोलिसांवर खूप मोठा ताण येणार होता. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी ईदनिमित्त काढण्यात येणारे जुलूस दुसऱ्या दिवशी काढावे, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले होते. या आवाहनाला नवी मुंबईतील मुस्लिम बांधवांनी प्रतिसाद दिला असून गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ सप्टेंबर रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे पोलिस तसेच गणेशोत्सव मंडळांकडून स्वागत केले जात आहे.
यावर्षी गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी आहेत. या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, दोन्ही सण शांततेत साजरे व्हावेत, या पार्श्वभूमीवर परिमंडळ १चे पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी वाशीतील साहित्य मंदिर सभागृहात गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व मुस्लिम बांधवांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पानसरे यांनी मुस्लिम समाजाने जुलूस २८ सप्टेंबर ऐवजी २९ सप्टेंबरला काढावा, असे आवाहन केले. मुस्लिम बांधवांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जुलूस दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय सभागृहात जाहीर केला. या निर्णयामुळे पोलिसांसह गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी परिमंडळ १मधील सहायक पोलिस आयुक्त व सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपस्थित होते.
सण-उत्सवाच्या काळात लोक मोठ्या संख्येने जमतात, अशा परिस्थितीत काही समाजकंटक त्या गर्दीचा फायदा उचलत गैरप्रकार करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळे या काळात कोणीही चुकीचे काम करताना दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, पोलिस तातडीने मदत करतील. येणारे सर्व सण शांततेत पार पडावेत, यासाठी पोलिस विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. – विवेक पानसरे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण शांततेत साजरे व्हावेत, यासाठी पोलिसांकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आम्ही अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी ईद-ए-मिलादनिमित्त जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात शहरात कुठल्याही प्रकारची अशांतता निर्माण होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. – आलम बाबा, अध्यक्ष, नवी मुंबई मुस्लिम एकता समाज
पनवेलमध्येही स्तुत्य निर्णय:
परिमंडळ-२चे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनीही पनवेलमधील गणेशोत्सव मंडळे व मुस्लिम बांधवांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीतही तेथील मुस्लिम बांधवांनी गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जुलूस काढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार, पनवेलचे सहायक आयुक्त अशोक राजपूत व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.