पुणे : चार दिवसापूर्वीच हडपसर भागातील फुरसुंगीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. परंतु पूर्णत: कुठेही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. तर काही ठिकाणी हे असे अवैध जुगाराचे अड्डे आजही सुरू असल्याचे समोर आले आहे. नाममात्र कारवाईमुळे सदर जुगार व्यावसायिकांवर याचा काहीच परिणाम होताना दिसत नाही, की त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. अश्याच एका ठिकाणी हडपसर पोलीस ठाणेच्या हद्दीत गजबजलेल्या रहिवाशी परिसरामध्ये सम्राट गार्डन रोड, जुना कॅनॉल शेजारी किरण जगताप नामक व्यक्ती त्याच्या राहत्या घराशेजारी मोठ्या प्रमाणात पैश्यांची देवाण-घेवाण करून पत्त्याचा जुगार अड्डा चालवित आहे. दिवसरात्रो सुरु असणाऱ्या या जुगार अड्ड्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांची मदयपींची नेहमीच वर्दळ असलेली दिसून येते. या अवैध धंद्यामुळे आजुबाजुला राहणाऱ्या शांतता प्रेमी नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात मन:स्ताप होत आहे. स्थानिक पोलीस ठाणे कारवाई करीत नाहीत, त्याकडे ‘अर्थपूर्ण’ कानाडोळा करत आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सामाजिक सुरक्षा विभागासह, क्राईम युनिट यांच्याकडून संबंधित जुगार व्यावसायिकांवर व जुगार अड्ड्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. अशी मागणी जागरूक नागरिक करीत आहेत.