मुंबई : मुंबईच्या सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत घडलेल्या एका भयंकर घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली आहे. यात तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या एका नराधमाने अमानुष अत्याचार केलाय. आज ती पीडित चिमुकली सायन रुग्णालयात उपचार घेत आहे. तर या चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, याच मुद्याला घेऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत ‘हे’ फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे! अशा आशयाची पोस्ट करत एकप्रकारे इशारा दिला आहे. सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत घडलेल्या एका भयंकर घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या नराधम अनिल गुप्ताने अमानुष अत्याचार केला. आज ती चिमुकली सायन रुग्णालयात जीवनमरणाच्या झुंजीत आहे. हा केवळ एका चिमुकलीवर नाही, तर आपल्या समाजाच्या संवेदनांवर झालेला आघात आहे. मुंबईसह इतर शहरांमध्ये दिवसेंदिवस ड्रग्सचं प्रमाण वाढतं आहे, अनेक घरं उद्ध्वस्त होत आहेत. महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दादर, सायनसारख्या भागातही ड्रग्सच्या विळख्यात गर्दुल्यांची संख्या वाढली असून महिलांनी याबाबत माझ्याकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. भारतीय नौसेनेकडून अंदमान समुद्रात ५ टन ड्रग्स वाहून नेणाऱ्या मच्छीमार बोटीवर कार्यवाही करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स भारतात येतं कुठून? ते पोहोचतं कुठे? आणि याच्या पाठीमागे असलेला सूत्रधार कोण? या प्रश्नांची उत्तरं मिळवणं आणि ड्रग्सचं नेटवर्क मोडून काढणं आता अत्यावश्यक झालं आहे.
मनसेनं सुरुवातीपासूनच अशा नराधमांवर कठोर कारवाईसाठी भूमिका घेतली आहे. म्हणूनच माझ्या वचननाम्यात मी ड्रग्स विक्री, सेवन करणाऱ्यांवर कठोर उपाययोजना करण्याचं वचन दिलं होतं आणि आज त्या दिशेनं पाऊलं टाकत आहे. सायनमधील या नराधमाला अटक झाली असली, तरी फक्त अटक पुरेशी नाही. काही महिन्यांपूर्वी सायन रुग्णालयात महिला डॉक्टरवर मद्यधुंद पेशंटने अतिप्रसंग केल्याची घटना समोर आली होती. या सगळ्याचा तपास जलदगतीने आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण झालाच पाहिजे. आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेतून कडक शिक्षा झालीच पाहिजे. जर या प्रकरणात ठोस कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा नराधमांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही! हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी, ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी मनसेचा संकल्प अटळ आहे. आता वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहून या नराधमांना आणि त्यांच्या समर्थकांना जशास तसं उत्तर देण्याची! अशा आशयाची पोस्ट करत अमित ठाकरे यांनी कडक शिक्षेची मागणी करत इशारा दिला आहे.