मुंबई : राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये महायुतीला यश आले. राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरलीये. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला देखील मोठे यश या निवडणुकीमध्ये बघायला मिळाले. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाले आणि महायुतीला धक्का बसला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व चित्रच वेगळे बघायला मिळाले. राज ठाकरे हे महायुतीसोबत होते. मनसेने १२८ ठिकाणी आपले उमेदवारही उभे केले. मात्र, मनसेचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेंना देखील पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही ही सत्य परिस्थिती असली तरीही उद्धव ठाकरे गटाला मनसे उमेदवारांमुळे मोठा फायदा निवडणुकीमध्ये झाल्याचे स्पष्ट झाले. हेच नाही तर वरळीमधून मनसेचा उमेदवार असल्याने आदित्य ठाकरेंना मोठा फायदा झाला. मनसेच्या उमेदवाराने काही मते खाल्ली ज्याचा फायदा थेट उद्धव ठाकरे गटाला झाला. आता परत एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? या चर्चांना उधाण आले.
महायुतीमधील घटकपक्ष म्हणून जरी विधानसभेची निवडणूक मनसेने लढवली असली तरीही मनसेला एकही जागा मिळवण्यात यश मिळाले नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे २० उमेदवार निवडून आले. मनसे असो किंवा शिवसेना दोन्ही पक्षांना विधानसभेत यश मिळाले नाही. आता परत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनी एकत्र येऊन पुढील काळात येणाऱ्या निवडणुकीत एकत्र लढवाव्यात, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जातंय. पुढील काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि विशेष: मुंबई महानगरपालिकेची निवडणुकही आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढल्या तर दोघांनाही फायदा होईल, असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का यावर कोणीही भाष्य करत नाही. जर खरोखरच हे दोघे एकत्र आले तर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलल्याचे नक्कीच बघायला मिळेल.