मुंबई : २००४ साली जर राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळालं असतं तर आजपर्यंत ते कायम राहिलं असतं. आता शरद पवार जे सांगतायेत ते धादांत खोटे आहे. मुख्यमंत्रिपद न घेण्यामागे काही ना काही कारण आहे असं सांगत अजित पवारांनी मोठा दावा केला आहे. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. यात अजित पवारांनी सांगितलं की, २००४ बद्दल शरद पवारांनी काही विधान केले, त्यावेळी जर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता असं ते बोलले. परंतु हे धादांत खोटे आहे. मी त्यावेळी होतो, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा हे आम्हाला वाटत होतं. त्यावेळी मला मुख्यमंत्रिपदात रस नव्हता. छगन भुजबळ हे मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं, पक्ष स्थापनेपासून भुजबळांनी गावोगावी जात संघटना वाढवण्याचं काम केलं होतं. त्या काळात इतकं वातावरण निर्माण होऊनही राष्ट्रवादीला ५८ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर २००४ मध्ये काँग्रेसपेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या असं त्यांनी सांगितले.
तसेच १९९१ शरद पवारांना संरक्षण मंत्री केंद्रात जायची वेळ आली तेव्हा बहुतांश आम्ही सगळे काँग्रेस आमदार सेवासदनला बसले होते. तेव्हा एकत्र काँग्रेस होती. आमदारांच्या बैठकीत पद्मसिंह पाटलांचं नाव पुढे आलं होतं, त्यावेळी सुधाकरराव नाईकांचं नावही चर्चेत नव्हतं. सुधाकरराव नाईक यांच्या हाताखाली आम्ही सगळ्यांनी काम केले. केंद्रात जाताना शरद पवारांनी पद्मसिंहांना खुर्ची न देता नाईकांना पुढे आणलं आणि सरकार बनवलं. १९९१ नंतर १३-१४ वर्षांनी अशी संधी आली होती तेव्हा कुणी नवखे होते हे म्हणायचं कारण नव्हतं. पण आता काहीपण सांगतायेत असंही अजित पवारांनी म्हटलं. दरम्यान, नाईकांना मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांनी १ वर्षही साहेबांचं ऐकलं नाही. १७ लोकांना आम्हाला मंत्रिमंडळातून काढलं. तिथून सगळी गडबड झाली. २००४ ला कदाचित हा विचार शरद पवार-प्रफुल पटेल यांच्यात झाला असेल की, १९९१ ला मुख्यमंत्री करून एक वर्षात कुणी ऐकलं नाही आता जर मुख्यमंत्री केले तर आपल्या दोघांना कायम दिल्लीला पाठवतील. त्यामुळे मुख्यमंत्री पद घेतले नसेल. काही ना काही कारण आहे. २००४ ला मुख्यमंत्रिपद घेतले असते तर तिथून कायम राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राहिला असता असा दावा करत अजित पवारांनी आपण पुन्हा जोमाने कामाला लागू. युद्धात आणि तहात दोन्हीत जिंकू असं आवाहन कार्यकर्त्यांना केले.