मुंबई : धारावीतील ७० टक्क्यांहून अधिक जागा महापालिकेच्या मालकीची आहे. पाच हजार कोटींपेक्षा जास्त रुपये प्रीमिअम म्हणून महापालिकेला मिळायला हवे. ‘म्हाडा’लाही दोन हजार कोटी मिळायला हवेत; पण हे पैसे अदानीची कंपनी स्वतःच घेणार आहे. प्रत्येक कॅबिनेटमध्ये अदानी प्रकल्पाला काही ना काही सूट सरकार देत आहे. धारावीतील महाघोटाळा समोर येऊ नये यासाठी मुंबई महापालिका निवडणुका दोन वर्षांपासून घेतलेल्या नाहीत, असा आरोप उद्धवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. मातोश्री येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापालिकेला कर्मचाऱ्यांचे पगार देता येत नाही, बेस्ट बसेस कमी केल्या आहेत. नागरी सुविधांअभावी मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. तर, महापालिकेत जे प्रशासक आहेत त्यांनी हे पैसे सोडून दिलेत. स्थानिक लोकप्रतिनिधी नसताना, महापौर नसताना धारावीतील मालकी हक्काची जागा फुकटात देण्याचा अधिकार प्रशासकांना दिला कुणी, असा सवालही त्यांनी केला.
मुख्यमंत्री यांचे नगरविकास खाते आणि महापालिका मिळून मुंबईची लूट करत आहेत. कंत्राटदारांची ४० हजार कोटींची थकबाकी आहे; परंतु फक्त लाडक्या कंत्राटदारांना सरकार पैसे देते. त्यातून स्वतःची टक्केवारी काढतात, असा आरोपही त्यांनी केला.