मुंबई : गरीब रुग्णांना रुग्णसेवेची अट घालून मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयांना पालिकेने जागा दिली. मात्र खासगी रुग्णालयांकडून त्याचे उल्लंघन होत असून पालिका रुग्णालये सुविधा पुरविण्यात अपुरी पडत आहेत. ही परिस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार असून गरीब रुग्णांना सेवा नाकारणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केईएम आणि नायर रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी रुग्णालयातील स्थितीचा आढावा घेतला. गरजेच्या तुलनेत रुग्णांना सुविधा कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे रुग्णालयांवर फार मोठा ताण आला आहे. पालिकेने खासगी रुग्णालयांना जवळच्या जागा देण्यात आल्या आहेत. मात्र पालिका रुग्णांना जागा नाहीत, याची माहिती घेऊन खासगी रुग्णालयांवर शिल्लक चटई क्षेत्रफळ निर्देशांकांमध्ये (एफएसआय) मजले काढून पालिकेने चालवावेत. पालिकेकडे स्वत:ची वैद्यकीय महाविद्यालये असून ती सर्व सुविधांनी सज्ज आहेत.
पालिका देत असलेल्या सुविधांप्रमाणे अन्य रुग्णालय सुविधा देऊच शकत नाही. मुंबईला आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच आयुक्त, कामगार रुग्णालय प्रशासन, आरोग्य मंत्री यांच्याशी बैठक घेऊन ही परिस्थिती मांडणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. खासगी रुग्णालयांच्या जागा पालिकेच्या असून रुग्णांना सेवा देण्याच्या अटीवर या जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे याची चौकशी करण्यात येईल, असेही केसरकर यांनी सांगितले.