ठाणे : हवेची गुणवत्ता कायम राखण्यासाठी उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसात हवा प्रदूषणास कारणीभूत असलेल्या राडारोडा वाहतूक करणाऱ्या १३२ वाहनांवर पालिकेने कारवाई करून ४ लाख ८३ हजार रुपयांचा दंड महापालिकेने वसूल केला आहे. तर शासकीय प्रकल्पाच्या ठेकेदारांवरही दंडात्मक कारवाई केली आहे.
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे आखून दिल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने भरारी पथके तयार केली आहेत. या पथकांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून कारवाई केली जात आहे. त्यानुसार, शहराच्या वेशीवरील आनंदनगर, मॉडेला चेक नाका या ठिकाणी पथक तैनात करण्यात आले असून या पथकाने राडारोडा वाहून नेणाऱ्या १३२ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ४ लाख ८३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ठाणे महापलिका हद्दीत मेट्रो, रस्ते दुरुस्ती, नव्याने रस्ते बांधणे अशी विविध ८३ ठिकाणी कामे सुरु आहेत. त्यापैकी १३ ठिकाणी पालिकेच्या भरारी पथकाकडून पाहणी करण्यात आली. यातील ९ ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले. त्यामुळे महापालिकेने सबंधित कंत्राटदारावर दंडात्मक करवाई करीत ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मोकळ्या जागेत शेकोटी अथवा कचरा जाळणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. कचरा जाळणारे आणि शेकोटी करणाऱ्यांकडून दोन लाख ५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.