मुंबई : सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत साडे तीन किलो सोन्याच्या दागिन्यांची तस्करी केल्याप्रकरणी परदेशी महिलेला अटक केली. तिच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सुमारे पावणे दोन कोटी रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले.
साहरा मोहम्मद ओमर (४०) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ती युनायटेड किंगडमच्या (युके) पारपत्रावर भारतात आली होती. ती मूळची केनिया देशातील नागरिक आहे. ती केनियातील नायरोबी येथून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर आली होती. तिच्याबाबत सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे तिला थांबवून तपासणी केली असता अंर्तवस्त्रमध्ये सोने लवपले असल्याचे निष्पन्न झाले. तपासणीत तिच्याकडे सोन्याच्या १७ लगड सापडल्या. त्यांचे वजन ३४६५ ग्रॅंम असून किंमत एक कोटी ६४ लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सर्व सोने जप्त करण्यात आले असून महिलेविरोधात सीमा शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.
जप्त करण्यात आलेले सोन्याच लगड २२ कॅरेटचे आहेत. २१ कॅरेट सोन्याचे दागिने तिने परिधान केले होते. सर्व सोने पंचनामा करून ते सोने ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी महिलेने प्रथमच सोन्याची तस्करी केल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले. याबाबत सीमाशुल्क विभाग अधिक तपास करत आहे.