मुंबई : पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलमध्ये विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत २५ टक्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एसी लोकलचा पासधारकांना गर्दीचा सामना करावा लागतो आहे. त्यातच आता उन्हाळ्या सुरु झाल्याने एसी लोकलमध्ये फुकटे प्रवाशांची संख्या वाढत जात असल्याने रेल्वेची डोकेदुखी वाढली आहे. मुंबईत दमट हवामान त्यातच उन्हाळा आला की, लोकलच्या प्रवास नकोस वाटतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी मुंबईतील एसी लोकलकडे धावत घेतात. या कालावधीत एसी लोकलच्या प्रवाशांची संख्या सुद्धा वाढते.
मात्र त्याच बरोबर उन्हाळाच्या उकाळ्यापासून बचावासाठी फुकटे सुद्धा एसी लोकलमध्ये शिरकाव करतात. यांची संख्या सुद्धा उन्हाळ्यात सगळ्यात जास्त असल्याचे निदर्शनात येत आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार दरम्यान दिवसभरात एसी लोकलच्या ९६ फेऱ्या चालविण्यात येतात. या फेऱ्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. सकाळी आणि संध्याकाळी पीक अवरच्या वेळी तर एसी लोकलमधून प्रवासी उभ्याने प्रवास करतात.त्यामुळे एसी लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष मोहिम राबविण्यात येतात. या मोहिमेमधून एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत जवळपास एसी लोकलमधून ६० हजाराहून अधिक अनधिकृत प्रवाशांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून २०० लाख एवढा दंड आकारण्यात आला आहे. एसी लोकलमधून विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत २५ टक्यांनी वाढ झाल्याची कबुली स्वतः पश्चिम रेल्वेने दिली आहे.