मुंबई : सणासुदीच्या काळात मिठाई आणि तत्सम अन्नपदार्थाच्या मागणीत होत असलेली वाढ लक्षात घेऊन त्यात भेसळ करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या पदार्थांची खातरजमा करून सर्वसामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी गणेशोत्सवादरम्यान अन्न व औषध प्रशासन मुंबई विभाग व ठाणे कार्यालयाने एकत्रितरित्या विशेष मोहीम राबवली. या मोहिमअंतर्गत मुंबई विभागात एकूण ६० तपासण्या करण्यात आल्या व एकूण ७६ अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.
सणासुदीच्या काळात खाद्यतेल, मिरची पावडर व दूध या अन्नपदार्थावर अन्न व औषध प्रशासनाने जप्तीची कारवाई केली. मिरची पावडरच्या वेष्टनावर कोणत्याही प्रकारचा मजकूर न छापल्याने किंवा लेबल न लावल्याने ७४८ किलो वजनाचा आणि २ लाख ८४ हजार २४० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. तसेच कमी दर्जाचे आणि बनावट लेबल असलेले ७४४ किलोचे १ लाख ११ हजार ६०० रुपये किमतीचे रिफाईंड सूर्यफुल तेल जप्त करण्यात आले. मालाड पूर्व येथे दोन ठिकाणी धाडी टाकून विविध कंपन्याच्या पिशवीबंद दुधाचा १७ हजार २८ रुपये किमतीचा एकूण २८५ लिटर साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. या सर्व खाद्यपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई विभागात सद्यः स्थितीत तुटपुंजे मनुष्यबळ असतानाही ठाणे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. जनतेस सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या मोहिमा भविष्यातही राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई विभागाचे सहआयुक्त (अन्न) म. ना. चौधरी यांनी दिली.