एका १८ वर्षीय तरुणीने आईला मेसेज करून लवकर घरी येत असल्याचं कळवलं परंतु ती घरी परतलीच नाही. तिची हत्या झाल्याचं समोर आला आहे. तिच्या मित्रानेच ही हत्या केल्याचं तपासात उघड केला आहे. ही घटना दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील संजय वन परिसरात घडली आहे. या हत्येमागचं कारण अद्याप समजू शकलेले नाही आहे. आरोपीचं नाव अर्शकृत सिंग (१८ वर्षीय) असं आहे. त्याने ही हत्या का केली अद्याप समजू शकलेले नाही आहे.
१८ वर्षीय अर्शकृत सिंग हा राणी बाग येथील रहिवासी आहे आणि बी. कॉम. चा प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. मृत तरुणी आणि आरोपी अर्शकृत दोघेही दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगध्ये शिकत होते.रविवारी १ जून रोजी तरुणी कॉलेजला जाण्याच्या निमित्ताने घरा बाहेर पडली. दुपारी १२ वाजता तिने आईला मेसेज करून लवकरच घरी येत असल्याचं कळवलं. पण ती घरी परतलीच नाही. त्यामुळे तिच्या आई वडिलांनी तत्काळ शोध सुरु केला. अर्शकृतच्या आई वडिलांनी पीडित मुलीच्या आईला फोन केला आणि सांगितलं की अर्शकृतवर संजय वनमध्ये हल्ला. त्याच्यावर पितमपुरा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. यानुसार पीडित मुलीचे आई- वडील संजय वन परिसरात तिचा शोध घेण्याकरिता गेले. मात्र, तरीही ती तिथे सापडली नाही. अखेर, आईच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी अर्शकृतची चौकशी केली असता त्याने ही हत्या केल्याची कबुली दिली. चौकशी दरम्यान त्याने पोलिसांना सांगितले की, संजय वनमध्ये त्यानेच मुलीला भेटायला बोलावले होते. एका निर्जन स्थळी नेलं. तिथे तिच्यावर चाकूहल्ला केला. तिचा गळा दाबला आणि तिला जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यादरम्यान त्याच्याही हाताला दुखापत झाली, त्यामुळे तो रुग्णालयात गेला आणि त्याने त्याच्या कुटुंबियांना कळवलं. पोलिसांनी पीडित तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले. हत्येत वापरलेला चाकू देखील जप्त करण्यात आला आहे. आता एफआयआरमध्ये खून आणि पुरावे नष्ट करण्याचे कलम जोडले गेले आहेत. या गुन्ह्यामागील हेतू आणि हा गुन्हा पूर्वनियोजित होता का याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.







